शुक्र, १३, नोव्हें २०२६•पुणे आवृत्ती
Desk
विशेष बातमीसंस्कृती व जीवनशैली

म्हसोबावाडीतील श्री यशवंतराव यात्रेत पालखी अंगावरून नेण्याची प्रथा यंदापासून बंद; पोलीस प्रशासन आणि यात्रा कमिटीचा महत्त्वपूर्ण निर्णय

श्री यशवंतराव यात्रेत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी भिगवण पोलिस प्रशासन आणि म्हसोबावाडी यात्रा कमिटीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; श्रद्धा जपा, परंपरेचा सन्मान राखा, मात्र स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालू नका, पोलिसांचे आवाहन.

RP

Rohit Pawar

puneprimetimes@gmail.com

12 Nov 2026, 4:19 pm•13h ago
WhatsApp𝕏 Post
म्हसोबावाडीतील श्री यशवंतराव यात्रेत पालखी अंगावरून नेण्याची प्रथा यंदापासून बंद; पोलीस प्रशासन आणि यात्रा कमिटीचा महत्त्वपूर्ण निर्णय
प्रतिनिधिक छायाचित्र (AI Generated: Pune Prime Times)

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी घेतला ऐतिहासिक निर्णय

म्हसोबावाडी (विशेष प्रतिनिधी) : इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरातील म्हसोबावाडी येथील ग्रामदैवत श्री यशवंतराव यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता आणि यात्रा शांततेत पार पडावी, यासाठी भिगवण पोलिस प्रशासन आणि यात्रा कमिटीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पालखी, ढोल व सासनकाठ्या मंदिरात प्रवेश करताना मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ भाविकांनी जमिनीवर झोपून पालखी अंगावरून नेण्याची जुनी प्रथा यंदापासून कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

रविवार, दि. ८ रोजी सायंकाळी ७ वाजता श्री यशवंतराव मंदिरासमोर भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. सोमनाथ शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा कमिटी आणि म्हसोबावाडी ग्रामस्थांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पोलीस पाटील तुषार झेंडे, तंटामुक्ती अध्यक्ष साळुंखे, मोहिते, सरपंच रमेश चांदगुडे, आण्णा चांदगुडे, संदिप चांदगुडे यांच्यासह यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि म्हसोबावाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गर्दीचे नियोजन आणि अपघाताचा धोका टाळण्यासाठी पाऊल

या आढावा बैठकीमध्ये यात्रेतील भाविकांच्या गर्दीचे सुयोग्य नियोजन, भाविकांची सुरक्षितता, धार्मिक कार्यक्रमांमधील शिस्त आणि कोणताही संभाव्य अनुचित प्रकार रोखण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. श्री यशवंतराव यात्रेदरम्यान पालखी मंदिरात प्रवेश करताना भाविक मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जमिनीवर झोपतात आणि त्यांच्या अंगावरून पालखी नेली जात असे. या प्रथेमुळे गर्दीच्या वेळी भाविकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

"श्रद्धा जपा, परंपरेचा सन्मान राखा; मात्र स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालू नका. सुरक्षिततेचे भान ठेवून धार्मिक उत्सव शांततेत साजरा करणे हीच खरी निष्ठा आहे." — सोमनाथ शेंडगे (सहाय्यक पोलिस निरीक्षक, भिगवण पोलिस ठाणे)

निर्णयाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई

भिगवण पोलिस प्रशासनाकडून समस्त ग्रामस्थ व भाविकांना स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे की, या निर्णयाचे उल्लंघन करून कोणीही मंदिर प्रवेशद्वाराजवळ झोपून पालखी अंगावरून नेण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्यास किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास यात्रा कमिटीला जबाबदार धरले जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला. यानंतर उपस्थित सर्व ग्रामस्थ, यात्रा कमिटी आणि भाविकांनी कायद्याचे व सुरक्षिततेचे पालन करत सर्वानुमते सदरची प्रथा बंद करण्यावर एकमत दर्शविले.

प्रशासनाच्या या सुरक्षितता-केंद्री निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, यात्रा शांततेत व उत्साहात पार पाडण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

ही बातमी शेअर करा

पुणेकर नागरिक व आपल्या परिचितांपर्यंत बातमी पोहोचवा

WhatsApp𝕏 Post